मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या झाकी उर रेहमान लख्वी याची सुटका करण्याच्या लाहोर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
गेल्या आठवडय़ात लख्वीची सहा वर्षांच्या तुरूंगवासानंतर रावळपिंडीतील अदियाला तुरूंगातून सुटका करण्यात आली होती. लाहोर उच्च न्यायालयाने त्याला स्थानबद्धतेत ठेवणे चुकीचे असून सोडून देण्यात यावे असा आदेश पंजाब सरकारला दिला होता.
लाहोर उच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात त्याची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले होते व त्यानंतर भारताने लख्वीला सोडल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत मुंबई हल्ल्यातील बळी पडलेल्या व्यक्तींचा तो अपमान आहे असे म्हटले होते.
भारताच्या पाकिस्तानातील राजदूतांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांना असे सांगितले की, लख्वी याच्या सुटकेने पाकिस्तान दहशतवाद्यांबाबत दुटप्पी भूमिका ठेवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने गेल्या डिसेंबरमध्ये झाकी उर रहमान लख्वी याला मुंबई हल्ला प्रकरणात जामीन मंजूर केला होता.