मुंबईतील २००८ मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार व लष्कर ए तय्यबाचा कमांडर झाकी उर रहमान लख्वी याला प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहण्यात सूट देण्यात यावी, कारण त्याच्या जिवाला धोका आहे अशी विनंती दहशतवाद विरोधी न्यायालयाला करण्यात आली आहे.
लख्वीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी इस्लामाबाद येथील दहशतवाद विरोधी न्यायालयात लख्वीच्या वतीने अर्ज सादर करून त्याच्या जिवाला धोका असल्याने त्याला सुनावणीस व्यक्तिगत उपस्थित राहण्यातून सूट मिळाली असा अर्ज केला आहे. अब्बासी यांनी न्यायालयाला सांगितले, की न्यायालयात येताना किंवा जाताना लख्वीचा खून होऊ शकतो. मुंबई हल्ल्याच्या दाव्याची फेब्रुवारी २००९ मध्ये न्यायालयात सुनावणी सुरू झाली. या खटल्यात लख्वी व इतर सहा जण आरोपी असून, त्यांनी रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात सुनावणीस हजेरी लावली आहे, पण लख्वीच्या सुटकेनंतर आता त्याला स्वत:चा जीव धोक्यात घालून सुनावणीस यावे लागेल, त्यामुळे त्याला व्यक्तिगत उपस्थितीतून सूट देण्यात यावी. लख्वीच्या अर्जावर न्यायालयाने फिर्यादी पक्षाला नोटीस दिली आहे. न्यायालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले, की तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या संस्थेचा एक गट व एक परदेशी गुप्तहेर संस्था आपल्याला ठार मारण्यास टपून आहे, त्यामुळे सुनावणीसाठी अदियाला तुरुंगात येणे धोकादायक आहे. कायद्यानुसार लख्वीला या सुनावणीसाठी व्यक्तिगत उपस्थित राहणे आवश्यक आहे.