भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानांनी बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक करण्याच्या पाचदिवस आधी तिथे २६३ दहशतवादी जमले होते. टाइम्स नाऊ वाहिनीने हे वृत्त दिले आहे. भारताने २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केला. जैशमध्ये भरती होण्यासाठी आलेले हे सर्व दहशतवादी आणि त्यांच्या ट्रेनर्सकडे असलेले मोबाइल फोन अॅक्टीव्ह होते. भारताच्या नॅशनल टेक्निकल रिसर्च संस्थेकडून (NTRO) या सर्व मोबाइल्सच्या सिग्नलवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते.

भारताच्या फायटर विमानांच्या हल्ल्यानंतर हे सर्व सिग्नल बंद झाले असे गुप्तचर खात्यातील सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स नाऊने म्हटले आहे. मृतांच्या आकडयाबद्दल भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण मोबाइल सिग्नलच्या आधारेच २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत आहे.

हल्ल्याच्यावेळी बालकोटमधील जैशच्या तळावर १८ सिनियर कमांडर्स तिथे उपस्थित होते. मोठया संख्येने तिथे आलेल्या दहशतवाद्यांना ते प्रशिक्षण देणार होते. जैशच्या या सिनियर कमांडर्सकडे अफगाणिस्तानात अमेरिकविरुद्ध युद्ध लढण्याचा अनुभव होता. भारताच्या हल्ल्यात हे सर्व ठार झाले असतील तर जैशसाठी तो मोठा दणका आहे.

मुफ्ती उमर, मौलाना जावेद, मैलाना अस्लम, मौलाना अजमल, मौलाना झुबेर, मौलाना अब्दुल गफूर काश्मिरी, मौलान कासिम आणि मौलान जुनैद हे दहशतवादी तिथे होते. हे सर्वजण जैशचा म्होरक्या मसूद अझहरचे निकटवर्तीय होते. या तळावर ८३ दहशतवादी दौरा-ए-आम म्हणजे दहशतवादाच्या प्राथमिक प्रशिक्षणासाठी आले होते. ९१ दौरा-ए-खास आणि २५ दहशतवाद्यांना फिदायनी आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार करण्यात येणार होते. इतक्या सर्व दहशतवाद्यांच्या जेवणासाठी आचारी, सुरक्षारक्षकही त्या तळावर होते अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.