तेगुसिगल्पा : कॅरेबियन बेटांवरील होंडुरासच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करणारी एक बोट बुडाल्याने २७ जण मरण पावले, तर ९ जण अद्याप बेपत्ता आहेत, असे देशाच्या लष्कराने सांगितले. मोस्क्विशिया भागातील दुर्गम किनाऱ्याजवळ ही बोट बुडाल्यानंतर ५५ लोक बचावले, असे सशस्त्र दलांचे प्रवक्ते जोस मेझा यांनी सांगितले.

खेकडे पकडण्यावरील हंगामी बंदी उठवण्यात आल्यानंतर ७० टन वजनाची ‘वॉली’ ही बोट निकारागुआ सीमेनजीक असलेल्या कॅबो ग्रॅशियस ए दिओस या देशाच्या सर्वात पूवेईकडील टोकावरून निघाली, तेव्ही तिच्यावर ९१ लोक होते. निघण्याच्या बिंदूपासून काहीच अंतरावर ईशान्येकडे असलेल्या कायो गोर्डा या लहानशा बेटाजवळ ही बोट बुडाली. या अपघाताचे कारण लगेच कळू शकले नाही.

बोट दुर्घटनेतील मृतदेह आणि त्यातून बचावलेल्या लोकांना पूर्व होंडुरासमधील मुख्य शहर असलेल्या प्युर्टो लेंपिरा येथे नेण्यात येईल, अशी माहिती मेझा यांनी दिली. ३१ जणांना नेण्याची क्षमता असलेल्या त्या बोटीवरून ४९ लोकांची सुटका करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.