‘सेंटर फॉर मॉनेटरींग इंडियन इकनॉमी’ या कंपनीने मंगळवारी प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये एप्रिल महिन्यात २० ते ३० वयोगटातील दोन कोटी ७० लाख भारतीय तरुण बेरोजगार झाले आहेत. मात्र देशातील काही ठिकाणी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उद्योगधंदे सुरु झाल्याचे सकारात्मक परिणा दिसून येत असल्याचेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. १० मे रोजी संपलेल्या आठवड्याच्या आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारी २७ वरुन २४ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. देशातील प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची संख्याही ३६.२ टक्क्यांवरुन ३७.६ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. तर देशातील रोजगाराच्या संधींमध्येही एप्रिलच्या तुलनेत २.२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात म्हटलं आहे.

सीआयएमआयने केलेल्या कस्टमर पिरॅमीड हाऊसओल्ड सर्वेक्षणानुसार नोकऱ्या गेलेल्यांपैकी ११ टक्के कामगार हे २० ते २४ वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. २०१९-२० च्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कामागारांपैकी ८.५ टक्के कामगार हे या वयोगटातील आहेत. या वयोगटातील ३ कोटी ४० लाख कामगारांना २०१९-२० मध्ये रोजगार उपलब्ध होता. मात्र आता हा आकडा दोन कोटी ९० हजारांच्या आसपास आला आहे.

२५ ते ३० वयोगटातील नोकऱ्या जाणाऱ्या कामगारांची संख्या ही एक कोटी ४० लाख इतकी असल्याचे सीआयएमआयच्या सर्वेक्षणामध्ये नमूद करण्यात आलं आहे. २०१९-२० च्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कामगारांपैकी ११.१ टक्के कामगार या वयोगटातील होते. मात्र आता बेरोजगार झालेल्यांपैकी ११.९ टक्के कामगार हे या वयोगटातील असल्याचे सर्वेक्षणामधून समोर आलं आहे.

२० ते ३० वयोगटातील तरुणांच्या नोकऱ्या गेल्याने याचा दिर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून येणाऱ्या वर्षांमध्ये नव्या पिढीतील तरुण आणि सध्या बेरोजगार असणारे असे सर्वचजण अल्प प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांसाठी स्पर्धेत असतील असं या अहवालात म्हणटं आहे. यामुळे या कामगारांना भविष्यासाठी बचत करण्याइतकी रक्कम बाजूला काढून ठेवणे कठीण जाईल असा अंदाजही या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

तिशीत असणाऱ्या तीन कोटी ३० लाख लोकांनी एप्रिलमध्ये आपला रोजगार गमावला असून त्यापैकी ८६ टक्के कामगार हे पुरुष असल्याचे या सर्वेक्षणात म्हटलं आहे.