नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी, गुरुवारी केंद्रीय रस्तेबांधणी व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी रस्तेविकासासंदर्भात भरघोष घोषणा केल्या. महाराष्ट्रसह आसाम, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांसाठी तसेच, लडाखच्या केंद्रशासित प्रदेशासाठी निधी जाहीर केला आहे. त्यापैकी महाराष्ट्रासाठी २७८० कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण, फेरबांधणी व पुनर्वसनासाठी निधी पुरवला जाणार आहे. विदर्भात नागपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्हे, मराठवाड्यात बीड, परभणी, जालना, कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याांतून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गांवर रस्तेविकासाची कामे केली जाणार आहेत. राष्ट्रीय महामार्गांची बांधणी म्हणजे ‘विकासाचा महामार्ग’ असे गडकरी यांनी म्हटले आहे.

या रस्त्यांचा विकास व आर्थिक तरतूद

एनएच ३६१ फ – परळी ते गंगाखेड (२२४.४४ कोटी), एनएच ५४३ – अमगाव ते गोंदिया (२३९.२४ कोटी), एन एच ६३ – मांजरा नदीवर नांदेड जिल्ह्याात पूलबांधणी (१८८.६९ कोटी), एनएच ५३ – नागपूर शहरातील पूलबांधणी (४७८.८३ कोटी), तिरोरा – गोंदिया राज्य महामार्ग तसेच एनएच ७५३ वर २८ किमीची रस्तेबांधणी (२८८.१३ कोटी), एनएच ३५३ क-१६ गडचिरोली जिल्ह्यात छोटे व मोठ्या पुलांची बांधणी (२८२ कोटी), एनएच १६६ ई- गुहागर ते चिपळूण विस्तारीकरण (१७१ कोटी), एनएच ७५३ जे – जळगांव ते चाळीसगांव ते मनमाड रस्ता विस्तारीकरण (२५२ कोटी). एनएच १६६ जी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळरे ते गगनबावडा-कोल्हापूर (१६७ कोटी). एनएच ७५३ तिरोरा- गोंदिया (२८२ कोटी) आणि एनएच ७५२- वाटूर ते चारठाणा (२२८ कोटी).