लॉक़डाउन सारख्या उपायोजना करुनही भारतात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी होत नाहीय. २२ जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यान भारतात एकूण ४०,१८४ करोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यात २८ टक्के रुग्ण करोना पॉझिटिव्ह असले तरी, त्यांच्यामध्ये करोनाची कुठलीही लक्षणे आढळली नव्हती. करोनाची अत्यंत सौम्य किंवा लक्षणे न आढळलेल्या व्यक्तींकडून या आजाराचा फैलाव झाल्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वैज्ञानिकांनी अन्य संस्थांसोबत मिळून केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली आहे. एकूण करोनाबाधितांपैकी ५.२ टक्के आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी होते असे इंडियन जनर्ल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या स्टडी रिपोर्टमध्ये म्हटले आहे. करोनाची लागण झालेल्या पण लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांची संख्या २८ टक्क्यापेक्षा जास्त असू शकते. हीच चिंतेची मुख्य बाब आहे असे नॅशनल इन्स्टियूट ऑफ एपिडेमियोलॉजीचे संचालक डॉक्टर मनोज मुरहीकर यांनी सांगितले.

२२ जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यान १०,२१,५१८ नागरिकांची करोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. मार्च महिन्याच्या सुरुवातीला दिवसाला २५० नागरिकांची चाचणी व्हायची. एप्रिल अखेरीस दिवसाला चाचण्यांचे प्रमाण ५० हजार होते. ३० एप्रिलला देशभरात करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या ४०,१८४ होती. त्यात २८ टक्के पॉझिटिव्ह असूनही लक्षणे न दिसणारे रुग्ण होते.