नेपाळमधील धादिड जिल्ह्यात शनिवारी प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत कोसळून किमान २८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका भारतीय महिलेचाही समावेश आहे. काठमांडूपासून सुमारे ७० किमी पश्चिम घाटबेसी वळणावर सकाळी पाच वाजता ही बस त्रिशुली नदीत कोसळली, अशी माहिती धादिडचे पोलीस अधीक्षक ध्रुव राज राऊत यांनी दिली. नेपाळ लष्कराचे जवान, इतर सुरक्षा दल आणि सशस्त्र दलाच्या जवानांनी पृथ्वी राजमार्गालगत असलेल्या या अपघातग्रस्त ठिकाणावरून १६ जखमी प्रवाशांना बाहेर काढले आहे.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, बचाव पथकाने आतापर्यंत २८ मृतदेह बाहेर काढले असून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. सर्व जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोन गंभीर जखमींना उपचारासाठी काठमांडू येथे नेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दाट धुक्यामुळे एका वळणावर चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीत कोसळली. या बसमध्ये ५२ प्रवासी होते, असे पोलिसांनी सांगितले.