देशात दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची होणारी वाढ पाहाता चिंतेचे वातावरण निर्णाण झाले आहे. मागील आठ दिवसांपासून देशात प्रत्येक तासांला एक हजरांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. आठ दिवसांत देशात दोन लाख नव्या करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असले तरी करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत २८ हजार सहाशे ३७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ५५१ करोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाख ४९ हजार ५५३ इतकी झाली आहे. पाच लाख ३४ हजरा ६२१ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर दोन लाख ९२ हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत २२ हजार ६७४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत, करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. देशपातळीवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२.७८ टक्क्यांवर पोहचले आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.

महाराष्ट्रातील मृतांचा आकडा  १० हजार पार

महाराष्ट्रात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० हजारांपेक्षा जास्त झाली. गेल्या २४ तासांत राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८१३९ करोनारुग्ण नोंदले गेले. टाळेबंदीसारखे कठोर उपाय  योजूनही राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यात दिवसभरात २२३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत १० हजार ११६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सातत्याने विविध राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ताज्या माहितीनुसार, रुग्ण वाढीची ही साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी गरजेप्रमाणे स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाउन करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, राज्यात पुणे आणि ठाण्यात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर केरळमधील थिरुवअनंतपुरम तसेच संपूर्ण उत्तर प्रदेशात पुन्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.