श्रीनगर :दक्षिण काश्मीरमध्ये २९ विदेशी दहशतवादी कार्यरत असल्याचे जम्मू- काश्मीर पोलिसांनी शनिवारी सांगितले. मात्र, त्यांचा सामना करण्याचा आणि या संपूर्ण भागातून दहशतवाद निपटून काढण्याचा सुरक्षा दलांना पुरेसा अनुभव आहे, हेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

‘कोकेरनाग, त्राल आणि  ख्रीव  यांच्या वरच्या भागात विदेशी दहशतवादी आहेत. दक्षिण काश्मिरात सुमारे २९ विदेशी दहशतवादी कार्यरत असून, ते खाली उतरतील आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळेल, तेव्हा आम्ही त्यांचा खात्मा करू’, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले.

विदेशी दहशतवाद्यांचे आव्हान मोठे आहे की स्थानिक दहशतवाद्यांचे असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, दोन्हींचे आमच्यापुढे आव्हान आहे, मात्र आमची दले त्यांचा सामना करण्यासाठी पुरेशी अनुभवी आहेत. त्यांना तोंड देण्याचे कौशल्य गेल्या २५ वर्षांत आम्ही मिळवले आहे. नेमकी माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. ती मिळाली की आम्ही त्यांना संपवू.