नवी दिल्ली : जीएसटी परिषदेच्या गुरुवारी झालेल्या २५व्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये २९ हस्तकला वस्तूंवरील तसेच ५३ प्रकारच्या सेवांवरील जीएसटी रद्द करण्यात आला आहे. तर, ४९ वस्तूंवरील जीएसटी स्लॅबमध्ये कपात करण्यात आली आहे. उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांनी ही माहिती दिली. या बैठकीत विविध प्रकारच्या ८० वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात करण्याचा मुद्दा अजेंड्यावर होता. या बैठकीत पेट्रोल-डिझेलवर कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. येत्या २५ जानेवारीपासून जीएसटी नवे दर लागू होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

जीएसटी परिषदेच्या बैठकीत ४९ वस्तूंवरील जीएसटीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वस्तूंवरील जीएसटी ५ ते १२ टक्क्यांच्या दरम्यान राहणार आहे. यामध्ये शेतीतील सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा समावेश आहे. त्याचबरोबर ज्या २९ हस्तकलेच्या वस्तूंवरील कर हटवण्यात आला आहे. यामध्ये गणेश मूर्तींसारख्या वस्तूंचा समावेश आहे. कारण देव-देवतांच्या मूर्तीकला ही हस्तकला या प्रकारात मोडते. यामुळे राज्याला या निर्णयाचा फायदा होणार असून यामुळे येत्या वर्षातील गणेशोत्सवात गणेश मूर्ती स्वस्त झालेल्या असतील.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबतही आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकलेला नाही. जीएसटी लागू करण्यात आला तर पेट्रोल-डिझेलच्या किंमती बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. त्याचबरोबर जीएसटीचा रिटर्न फाइलिंगचा अर्ज अधिक सोपा करण्यावर या बैठकीत निर्णय होऊ शकलेला नाही. याबाबत नंदन निलेकणी यांनी प्रझेंटेशन सादर केले. दहा दिवसांनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे पुन्हा एकदा परिषदेची बैठक होणार असून यावेळी जीएसटीला अधिक सुटसुटीत बनवण्यासाठी चर्चा होणार आहे.