देशाची राजधानी दिल्ली आणि ९ राज्यांमधल्या एकूण २९ शहरांना भूकंपाचा धोका आहे, असा धक्कादायक अहवाल राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं दिला आहे. भूकंपासाठी या २९ शहरांमध्ये गंभीर आणि अतिगंभीर स्थिती असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दिल्ली, पाटणा, श्रीनगर, कोहिमा, पाँडेचरी, गुवाहाटी, गंगटोक, शिमला, देहरादून, इम्फाळ ही या शहरांमध्ये गंभीर स्थितीचा भूकंप होऊ शकतो असं या अहवालात म्हटलं आहे.

या शहरांची लोकसंख्या ३ ते ४ कोटींच्या घरात आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राचे निर्देशक विनित गेहलात यांनी सांगितलं की भूकंपाच्या नोंदींनुसार ही यादी तयार करण्यात आली आहे. भूकंप झाल्यानंतर होणारं नुकसान आणि इतर बदल यांचा आधार घेत देशातल्या विविध शहरांमधले काही भाग २ ते ५ या झोन मध्ये वाटले गेले आहेत. भूकंपाची संवेदनशीलता किती आहे याचं वर्गीकरण शहरांनुसार करण्यात येतं.

भारतीय हवामान विभागाच्या अधिपत्याखालीच राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र काम करतं, याच केंद्रानं २९ संवेदनशील शहरांची यादी समोर आणली आहे. अति गंभीर भागांमध्ये देशाचा पूर्वोत्तर भाग, जम्मू काश्मीरमधले काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कच्छचं वाळवंट, उत्तर बिहारचा काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं यांचा समावेश होतो. या सगळ्यांचा समावेश झोन ५ मध्ये करण्यात आला आहे. तर जम्मूमधले काही भाग, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेशचा उत्तर भाग, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग हा झोन ४ मध्ये येतो असंही भूकंप विज्ञान केंद्रानं स्पष्ट केलं आहे.