दिल्लीत २०, पंजाबमध्ये सहा, महाराष्ट्रात तीन मृत्यू

राजधानी दिल्ली आणि पंजाबमध्ये शनिवारी प्राणवायूच्या तुटवड्यामुळे शनिवारी महाराष्ट्रासह २९ जणांना प्राण गमवावे लागले. दिल्लीतील रुग्णालयात प्राणवायूअभावी २० करोनारुग्ण दगावले, तर अमृतसरच्या रुग्णालयात सहा जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर बीडमध्ये प्राणवायूपुरवठा बंद पडल्याने दोघांचा आणि लातूरमध्ये एकाचा बळी गेला.

दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयात प्राणवायू संपल्याने २० रुग्णांनी प्राण गमावल्याचे शनिवारी रुग्णालय प्रशासनाने सांगितले. प्राणवायू तुटवड्याचा पेचप्रसंग गेल्या पाच दिवसांत विकोपाला गेला असून करोना रुग्णांना प्राणवायूची तातडीने गरज आहे. दर काही तासांनी रुग्णालयाकंडून प्राणवायूची मागणी येत आहे. समाजमाध्यमांवरही संदेश फिरत आहेत. महाराजा अग्रसेन रुग्णालयाने तर प्राणवायूसाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

दिल्लीतील जयपूर गोल्डन रुग्णालयात शनिवारी प्राणवायूचा दाब कमी झाल्याने २० जणांचा बळी गेला. रुग्णालयात सकाळी पावणेअकरा वाजता २०० रुग्ण होते. त्यावेळी अर्धा तास पुरेल इतका प्राणवायू शिल्लक होता. रुग्णालयातील ८० टक्के रुग्ण प्राणवायूवर होते.

ऑक्सिजनअभावी सर्वाधिक बळी जाण्याची दुसरी घटना अमृतसर येथील नीलकांत रुग्णालयात घडली. तेथे शनिवारी सहा जणांचा ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाला वारंवार विनंती करूनही मदत मिळू शकली नाही. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. सहा रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही केवळ पाच ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यात आल्याची खंत रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली. सरकारी रु ग्णालयांना ऑक्सिजन पुरवण्यास अग्रक्रम देण्याचे आदेश आहेत. खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळू नये म्हणून ऑक्सिजन प्रकल्पांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सर गंगाराम रुग्णालयात शुक्रवारी २५ रुग्ण दगावल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने, ‘‘प्राणवायूचा पुरवठा तोडण्यात आल्याचे एक उदाहरण पुढे आले तरी त्या व्यक्तीस फाशीची शिक्षा सुनावण्यात येईल, असा इशारा या संदर्भातील याचिकेच्या सुनावणीच्या वेळी दिला.