२०१८ पासून वाघांचे राज्य ही ओळख कायम

भोपाळ : मध्य प्रदेश या वाघांच्या राज्याने गेल्या १९ वर्षांत २९० वाघ गमावले असून अजूनही तेथे ६७५ वाघ आहेत. त्यात १२५ बछडय़ांचा समावेश आहे, अशी माहिती वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मध्य प्रदेशातील वाघांची संख्या वाढल्याचा दावा करताना त्यांनी म्हटले आहे, की भारतातील वाघांचे राज्य ही मध्य प्रदेशची ओळख कायम राहील. शिकार तसेच प्राणी-मानव संघर्षांत पाच टक्के वाघ बळी पडले असून काहींचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. कान्हा, बांधवगड, पेंच, सातपुडा, पन्ना, संजय गांधी राखीव क्षेत्र येथे ५५० वाघ आहेत. किमान १० ते २० वाघाचे बछडे जंगलात खुलेपणाने फिरत आहेत.

२००२ पासून २९० वाघ गमावल्याबाबत मुख्य वन संरक्षक आलोक कुमार यांनी सांगितले, की दरवर्षी २५-३० पट्टेरी वाघ गमावले जातात. त्यातील ९५ टक्के नैसर्गिक मृत्यू असतात. २९० पैकी पाच टक्के वाघांचे मृत्यू शिकार व अन्य कारणाने झाले आहेत. या भागातील वाघांचा जीवनकाल हा १२ ते १३ वर्षे आहे.

’ २०१० मध्ये मध्य प्रदेशने वाघांचे राज्य हा दर्जा गमावला होता. त्या वेळी मध्यप्रदेशात २५७ तर कर्नाटकात ३०० वाघ होते.

’ २०१४ मध्ये मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर गेला कारण तेथे ३०८ वाघ होते तर उत्तराखंडात ३४० व कर्नाटकात ४०८ वाघ होते.

’ २०१८ मध्ये वाघांचे राज्य हा नावलौकिक मध्य प्रदेशने पुन्हा मिळवला कारण त्या राज्यात कर्नाटकपेक्षा दोन अधिक म्हणजे ५२६ वाघ होते.