चालू वर्षांच्या पहिल्या दोन महिन्यातच दिल्लीत बलात्काराच्या २९० घटनांची नोंद झाली आहे, असे राज्यसभेत सांगण्यात आले. त्यावरून दिल्लीत महिलांविरोधातील गुन्हे कमी झाले नसल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय राजधानीत महिलांविरोधातील गुन्हे वाढत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री हरिभाई पार्थीभाई चौधरी यांनी सांगितले की, जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात दिल्लीत बलात्काराच्या २९० घटनांची नोंद झाली आहे. महिलांवर हल्ल्याच्या ६६२ घटनांची नोंद झाली असून विनयभंगाच्या २११ घटनांची नोंद झाली आहे. फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार पती किंवा सासरच्या लोकांकडून क्रूर वागणूक मिळाल्याच्या २८ हजार ४३८ घटनांची नोंद झाली आहे. हुंडाबळीच्या दोन महिन्यात १९ घटना झाल्या आहेत.
२०१४ व २०१३ मध्ये दिल्लीत बलात्काराच्या अनुक्रमे २१६६ व १६३६ घटना घडल्या होत्या, तर २०१२ मध्ये बलात्काराच्या ७०६ घटना घडल्या होत्या. चौधरी यांनी सांगितले की, दिल्लीत ८५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत असून त्यांची किंमत ३३३ कोटी रुपये आहे. एकूण ५२०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

राज्यसभेत माहिती
बलात्काराच्या घटनांची आकडेवारी
२०१५-  २९० (पहिल्या दोन महिन्यात)
२०१४- २१६६
२०१३- १६३६
२०१२-७०६