टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील आरोपींनी दिल्ली न्यायालयात तब्बल १०२९ अंतरिम याचिका दाखल केल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील महत्त्वपूर्ण मुद्दय़ांना बाजूला सारून किरकोळ मुद्दे आरोपींकडून या याचिकांद्वारे मांडण्यात येत आहेत. यामुळे न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया जात आहे, अशा शब्दांत विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी नाराजी व्यक्त केली.
आरोपींनी न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासाठी या याचिकांचा वापर केला आहे. अधिकाधिक कागदपत्रे सादर करून न्यायालयाला कमकुवत ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे न्यायालयाने सांगितले.
 या प्रकरणातील दोन आरोपींनी पंतप्रधान कार्यालयाला समन्स पाठवण्यासाठी वेगळ्या याचिका दाखल केल्याने नाराजी व्यक्त करत न्यायालयाने आरोपींना सुनावले. पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या याचिका का दाखल केल्या जातात, असा संतप्त सवाल सैनी यांनी विचारला. जाडजूड कागदपत्रांचा बडगा न्यायालयापुढे सादर केला, तर हे प्रकरण कमकुवत होईल, अशी आशा आरोपींना वाटते, असे सैनी यांनी सांगितले.
माजी दूरसंपर्कमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कणिमोळी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांवर याप्रकरणी खटला सुरू आहे.