टू जी घोटाळ्यातील सरकारी पक्षाच्या महत्त्वाच्या साक्षीदार आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांची पत्नी दयालू अम्मा यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयापुढे साक्ष देण्यापासून सूट मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वैद्यकीय कारणांमुळे आपण विशेष न्यायालयापुढे साक्ष देऊ शकणार नाही, असे त्यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.
साक्ष देण्यापासून सूट मिळावी, यासाठी विशेष न्यायालयात त्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दयालू अम्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयातही दाद मागितली होती. मात्र, टू जी घोटाळ्याच्या तपासावर आणि सुनावणीवर सर्वोच्च न्यायालय लक्ष ठेवून असल्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.