कट-कारस्थान करून द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांच्या मालकीच्या कलैगनार या वाहिनीत तब्बल २०० कोटी रुपये बेकायदेशीररीत्या गुंतवल्याप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यासह द्रमुकच्या खासदार कणिमोळी व करुणानिधी यांच्या पत्नी दयालू अम्मल यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोषी आढळल्यास प्रत्येकाला किमान सात वर्षांचा कारावास होण्याची शक्यता आहे.
कलैगनार टीव्ही ही वाहिनी करुणानिधी कुटुंबीयांच्या मालकीची आहे. ए. राजा यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करून तसेच कट-कारस्थान करून या वाहिनीत २०० कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप आहे. त्यांच्या या कट-कारस्थानात द्रमुकच्या खासदार व करुणानिधी यांची मुलगी कणिमोळी, करुणानिधी यांची पत्नी दयालू अम्मल यांचाही समावेश होता. या प्रकरणी विशेष न्यायालयाने एकूण १९ आरोपींवर ठपका ठेवला आहे. त्यात दहा व्यक्ती व नऊ कंपन्यांचा समावेश आहे. राजा, कणिमोळी व दयालू अम्मल यांच्यासह स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहीद बलवा व विनोद गोएंका यांचाही समावेश आहे. सावकारी पद्धतीने पैसा वापरल्याचा आरोप या सर्वावर ठेवण्यात आला असून ११ नोव्हेंबरला यावरील पुढील सुनावणी होईल.