जम्मू काश्मीरच्या नागरिकांना प्रजासत्ताक दिनाची भेट देत प्रशासनानं इंटरनेट सेवा सुरू केली आहे. जम्मू काश्मीर प्रशासनानं राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा सुरू केली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून राज्यात २ जी मोबाईल इंटरनेट सेवांची सुरूवात करण्यात आली आहे. परंतु काही प्रणामात इंटरनेटवर प्रतिबंध करण्यात येणार आहे. याद्वारे ग्राहकांना ३०१ वेबसाईट्सच पाहता येतील. तसंच सोशल मीडियासाठी वापरली जाणारी अॅप्स मात्र नागरिकांना वापरता येणार नाहीत.

जम्मू काश्मीर प्रशासनानं यासंदर्भात एक अधिसुचना जारी केली आहे. याद्वारे मोबाईल फोनवर २ज इंटरनेटवरील बंदी हटवण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच नागरिकांना सर्च इंजिन, बँकींग, शिक्षण, बातम्या, प्रवास, सुविधा आणि रोजगार यासंबंधित वेबसाईट्सचाच वापर करता येणार आहे. पोस्टपेड आणि प्रीपेड सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना आता डेटा सेवेचा लाभ घेता येणार आहा. ३१ जानेवारीपर्यंत मोबाईलवर २जी इंटरनेटची सुविधा देण्यात येणार आहे. त्यानंतर याची समीक्षा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं या अधिसुचनेत म्हटलं आहे.

अहवालानंतर निर्णय
राज्यात परिस्थिती सामान्य होत असल्याचा अहवाल सुरक्षा यंत्रणांनी दिल्यानंतर इंटरनेट सेवांवरील निर्बंध काही प्रणामात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ ऑगस्ट रोजी राज्यात या सेवा स्थगित करण्यात आल्या होत्या. यानंतर अनेक स्तरातून याला विरोध झाला होता. सुरक्षेच्या दृष्टीनं अफवा पसरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

फेसबुक, ट्वीटर बॅन
इंटरनेटवरील निर्बंधांमुळे काश्मीरमधील व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं होतं. अशा परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांच्या अहवालानंतर प्रशासनानं राज्यात २ जी इंटरनेट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअॅपसारख्या अॅपच्या वापरावर मात्र बंदी कायम राहणार आहे. जर या ठिकाणची स्थिती सामान्य राहिली तर येत्या काळात पुन्हा एकदा हाय स्पीड इंटरनेट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.