2G घोटाळा प्रकरणात सर्व १७ आरोपी निर्दोष असल्याचा निकाल देणाऱ्या सीबीआयच्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी या खटल्यासंबंधी मोठा खुलासा केला आहे. काही लोकांनी निर्माण केलेल्या अफवा, चर्चा आणि भाकीतांवरच हा खटला सुरु होता. २०११ सालापासून सतत सात वर्षे एकही सुट्टी न घेता मी या खटल्यामध्ये पुरावा शोधत होतो, मात्र माझी सर्व मेहनत वाया गेली. सीबीआय या संबंधी एकही ठोस पुरावा सादर करु शकली नाही, असे न्या. सैनी यांनी म्हटले आहे.

१५५२ पानी आपल्या निकालामध्ये न्यायाधिश सैनी यांनी लिहिले आहे की, गेल्या सात वर्षात सर्व कामाच्या दिवशी ज्यात उन्हाळ्याची सुट्टीचा देखील समावेश होतो. मी स्वतः सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुल्या कोर्टात बसून 2G घोटाळ्यासंदर्भात कोणीतरी पुरावा घेऊन येईल याची वाट पाहत होतो. मात्र, माझी ही सर्व मेहनत वाया गेली. न्या. सैनी पुढे म्हणाले, या खटल्यात एकही साक्षीदार पलटला नाही. यावरुन ही गोष्ट स्पष्ट होते की सर्व लोक या प्रकरणी अफवा, चर्चा आणि भाकीतांच्या मागे पळत होते. यामध्ये लोकांच्या मतमतांतराला न्यायिक प्रक्रियेमध्ये स्थान नसते.

न्यायाधीशांनी निकालात लिहीतात, या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मोठ्या संख्येने लोकांचे ध्यान आपल्याकडे वळवले. दरम्यान, लोक न्यायालयाच्या टिपण्णी आणि निकालाचीच आस लावून बसले होते. सुनावणीच्या दिवशी देखील कोर्टरुममध्ये मोठी गर्दी असायची. न्या. सैनी यांनी या निकालात त्या लोकांबाबतही लिहीले आहे, ज्यांनी लिखित निवेदने देऊन या प्रकरणात सीबीआयने चौकशीनंतर सोडलेल्या अतिरिक्त आरोपींना बोलवण्याचे आणि त्यांची पुन्हा चौकशी करण्याबाबत लिहीले होते. मात्र, यातील एकाही निवेदनामध्ये कायदेशीर बाबी नव्हत्या. तर काहींनी दिलेल्या निवेदनांत या पूर्वीच न्यायालयाने दिलेल्या सूचनांचा समावेश होता.

दिल्लीच्या सीबीआय कोर्टाने गुरुवारी (२१ डिसेंबर) १.७६ लाख कोटी रुपयांच्या 2G घोटाळ्यातील सर्व १७ आरोपींची मुक्तता केली. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारच्या काळात स्प्रेक्ट्रम वितरणादरम्यान १.७६ लाख कोटींचा सरकारी महसूल बुडाल्याचा आरोप कॅग विनोद राय यांनी केला होता. त्यावेळी विरोधीपक्षांनी याला घोटाळा असे संबोधले होते. यामध्ये माजी दुरसंचार मंत्री ए. राजा आणि द्रमुकच्या खासदार कनीमोळी यांच्यासह अन्य १५ लोकांना आरोपी बनवण्यात आले होते. या आरोपींविरोधात सीबीआयबरोबरच अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) या प्रकरणी खटला दाखल केला होता.