‘टू-जी’ स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणाने पुन्हा एकदा उचल खाल्ली असून माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुकच्या खासदार कणिमोळी व अन्य १७ जणांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याखेरीज, द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या पत्नी दयाळू अम्मल यांचेही नाव सदर आरोपपत्रात समाविष्ट झाले असून पत्नी आणि कन्येविरोधात पुन्हा एकदा कायदेशीर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे करुणानिधी हे राजकीय पेचप्रसंगात सापडले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहीद उस्मान बलवा आणि विनोद गोएंका यांच्यावरही आरोपपत्रामध्ये ठपका आहे. द्रमुकच्या कलैग्नर वाहिनीला ‘स्वान टेलिकॉम’कडून २०० कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप बलवा आणि गोएंका यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याखेरीज, करुणानिधी यांच्या पत्नी दयाळू अम्मल, कन्या कणिमोळी, आसीफ बलवा, राजीव अग्रवाल, कलैग्नर टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक शरद कुमार यांच्याखेरीज अन्य १० जण तसेच नऊ कंपन्यांविरोधात आरोप ठेवण्यात आला आहे. केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष न्या. ओ. पी. सैनी यांच्यासमोर विशेष सरकारी वकील नवीनकुमार मत्ता यांनी या सर्वाविरोधात आरोपपत्र दाखल केले. यासंदर्भातील पुढील सुनावणी येत्या ३० एप्रिल रोजी होणार आहे.
१७ आरोपींना मार्चमध्ये सीबीआय न्यायालयाने तब्बल १७१८ प्रश्न पाठविले आहेत. सुनावणीदरम्यान या प्रश्नांची उत्तरे ए. राजा यांच्यासह सर्व आरोपींना द्यावी लागणार आहेत. हे प्रश्न नोंदविलेली फाइल तब्बल ६४८ पानी आहे!