टू जी स्पेक्ट्रम वाटपात भ्रष्टाचार झाला असून तत्कालीन सरकारचे धोरण चुकीचेच होते. सुप्रीम कोर्टानेही टू जी स्पेक्ट्रम वाटप रद्द केले होते, याकडे लक्ष वेधत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे.

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ए. राजा, कनिमोळींसह सर्व आरोपींना दोषमुक्त केल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. टू जी वाटपात भ्रष्टाचार नव्हता, हे सिद्ध झाले अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. दुसरीकडे भाजपकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मैदानात उतरले आहेत. जेटली म्हणाले, काँग्रेस या निर्णयाकडे सन्मानाचे प्रतिक म्हणून बघत आहे. पण प्रत्यक्षात टू जी वाटपात अनियमतता होती. २०१२ मध्ये सुप्रीम कोर्टानेही टू जी स्पेक्ट्रम वाटप प्रक्रियाच रद्द केली होती. त्यामुळे काँग्रेसने हा निर्णय निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र समजू नये, असे त्यांनी म्हटले आहे. २००८ मध्ये सरकारने २००१ मधील दराने स्पेक्ट्रमचे वाटप केले. यात वैयक्तिक हितांना प्राधान्य दिले हे स्पष्ट होते. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धोरणावर स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले, हे धोरणच चुकीचे होते, असेही ते म्हणालेत.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी जेटलींना प्रत्युत्तर दिले आहे. जेटली हे खोटं बोलणाऱ्यांचे नेते आहेत. न्यायालयाच्या निकालाने सत्याचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले. मोदी, विनोद राय यांनी कट रचला होता तो उघड झाला, आता ते देशाची माफी मागणार का, असा सवालही त्यांनी विचारला.