उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हिंदू युवा वाहिनीच्या तीन कार्यकर्त्यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बरेली येथील एका महिलेवर सामूहिक बलात्कार व पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री हा प्रकार घडला. बरेली येथील गणेश नगर परिसरात दिपक आणि अविनाश यांच्यात मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावण्यावरून वाद झाला होता, अशी माहिती पोलीस अधिक्षक रोहित सिंग सजवान यांनी सांगितली. अविनाश त्याच्या तीन मित्रांना फोन करून बोलावले. हे तिघेही हिंदू युवा वाहिनीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी दिपकच्या घरात बळजबरीने प्रवेश केला आणि घरातीला महिलांबरोबर गैरवर्तन करण्यास सुरूवात केली.

दिपकही भाऊ गौरवबरोबर तिथे पोहोचला. अविनाशला मारहाण करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच हिंदू युवा वाहिनीचे अध्यक्ष जितेंद्र शर्मा आणि शहराध्यक्ष पंकज आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आंदोलन केले.

भाजप नेते उमेश कथारिया हेही पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यावेळी हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकारी मयंक अरोरा यांच्याशी गैरवर्तणूक केली. पीडित महिलांनी हिंदू युवा वाहिनीच्या तिन्ही कार्यकर्त्यांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.