अरुणाचल प्रदेशात आठ दिवसांपूर्वी पवनहंस हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. त्या दुर्घटनेतील तीन जणांचे मृतदेह तिरप जिल्ह्य़ात सापडले आहेत. जास्त उंचीवरील भागात युद्धतंत्राचा सराव करणाऱ्या संस्थेच्या कमांडोंना हे मृतदेह सापडले. त्यात तिरपचे उपआयुक्त कमलेश कुमार जोशी व वैमानिक एम.एस.ब्रार व राजीव होस्कोटे यांचा समावेश आहे. पोलिस महासंचालक एस नित्यानंदम यांनी सांगितले, की एचएडब्ल्यूएस या जम्मू-काश्मीरच्या कमांडो पथकाला हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेल्या पर्वतीय भागात उतरवण्यात आले होते. वातावरण प्रतिकूल नसल्याने त्यांना मृतदेहांचा शोध घेता आला. हे मृतदेह कमांडोजनी उचलून खोन्सा येथे आणले, तेथून ते हेलिकॉप्टरने नेले जाणार आहेत, असे मुख्य सचिव रमेश नेगी यांनी सांगितले. तिरप व चांगलांग जिल्ह्य़ात आसाम रायफल्स, लष्कर, पोलिस, भारतीय हवाई दलाची एमआय १७ व चित्ता हेलिकॉप्टर, सुखोई विमाने यांनी शोध घेतला. जोशी यांच्या पत्नी नेहा व बंधू मेजर राजेश जोशी हे ६ ऑगस्टपासून खोन्सा येथे तळ ठोकून होते. प्रथम हेलिकॉप्टरचा मागचा भाग सांगलिम पासून ४-५ कि.मी. अंतरावर दिसला होता, तेथे दाट जंगल आहे.