रेल्वेत ९० हजार जागांवर भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून, पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रेल्वेकडे या रिक्त जागांसाठी तीन कोटींहून जास्त उमेदवारांचे अर्ज आले आहेत. मात्र यामधील २ कोटी ३७ लाख अर्ज पात्र आहेत. याविषयी बोलताना रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्वनी लोहानी यांनी रेल्वेच्या परिक्षेची तयारी अशाप्रकारे करण्यात आली आहे की, पेपर लीक होण्याची कोणतीच शक्यता नाही.

पेपर लीक होण्यासंबंधी शक्यतेशी संबंधित प्रश्नांवर बोलताना त्यांनी परिक्षा ऑनलाइन घेतली जाणार असून त्यासाठी मोठी प्रश्नपत्रिका तयार करणार असल्याचं सांगितलं. यामुळे भरती परिक्षेतील उमेदवारांना संगणकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील. अशा पद्धतीने पेपर लीक होण्याची शक्यताच उरणार नाही असं त्यांचा दावा आहे.

रेल्वे अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागांसाठी एकच परिक्षा घेतली जावी किंवा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन परिक्षा घेतल्या जाव्यात याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. आर्थिक वर्ष संपण्याआधी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असणार आहे.

याआधी झालेल्या भरती प्रक्रियेत ९२ लाख उमेदवारांचे अर्ज आले होते. रेल्वेने ९२ लाख उमेदवारांच्या परिक्षेची व्यवस्था केली असताना फक्त ५७ लाख उमेदवारच सामील जाले होते. यामुळे रेल्वेने तयारीसाठी खर्च केलेला बराचसा पैसा वाया गेला होता. यामुळे यावेळी रेल्वेने अर्जासोबत पाचशे रुपयांची फीदेखील ठेवली आहे. उमेदवार परिक्षेसाठी उपस्थित राहिल्यास नंतर त्यांना ते पैसे परत करण्यात येतील.