मंगळुरू : मंगळुरूच्या तटवर्ती क्षेत्राजवळ मंगळवारी सकाळी मच्छीमारांची एक नौका परदेशी जहाजावर आदळल्याने तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला असून अन्य नऊ मच्छीमार बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. आयएफबी राबाह या नौकेवर १४ मच्छीमार होते, केरळच्या कोझिकोडे जिल्ह्य़ातील बेपोर येथून रविवारी सायंकाळी ही नौका रवाना झाली होती. दुर्घटनेत तीन मच्छीमारांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचे नौकेचे मालक जाफर यांनी सांगितले. नौकेवरील १४ मच्छीमारांपैकी सात जण तमिळनाडूतील तर उर्वरित ओदिशा आणि पश्चिम बंगालमधील होते. नौकेवरील दोन मच्छीमारांना वाचविण्यात आल्याचे भारतीय तटरक्षक दलाने म्हटले आहे. बेपत्ता मच्छीमारांचा शोध सुरू आहे.