जर्मनीतील पश्चिमेकडच्या एस्सेन शहरात गुरुद्वारात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात तीन जण जखमी झाले आहेत. भारताने या हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त केले असून ही हेतुपुरस्सर करण्यात आलेली कृती आहे, असे म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणी काळ्या रंगाच्या एसयूव्ही वाहनातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी सांगितले की, नानकसार सत्तसंग दरबार गुरुद्वारा येथे स्थानिक प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजता स्फोट झाला. तेथे विवाह समारंभ सुरू होता. काही मुलांसह दोनशे जण उशिरा सुरू झालेल्या विवाहसमारंभास उपस्थित होते.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या सध्या इराणमध्ये असून त्यांनी जर्मनीतील राजदूत गुरजित सिंग यांना हे प्रकरण उच्चस्तरीय पातळीवर हाताळण्यास सांगितले आहे. भारताची नाराजी जर्मनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कानावर घालावी असे त्यांनी गुरजित सिंग यांना ट्विटरवर कळवले आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, भारतीय दूतावास जर्मनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहे. एस्सेन येथे जो स्फोट झाला ती दु:खकारक घटना आहे.

भारताचे महावाणिज्यदूत रवीशकुमार हे तातडीने एस्सेनला रवाना झाले असून ते जखमींची भेट घेऊन विचारपूस करणार आहेत तसेच पोलिसांशीही चर्चा करणार आहेत. जर्मनीचे पोलीस सर्व दृष्टिकोनातून चौकशी करीत आहेत. गुरुद्वाराचे ग्रंथी कुलदीप सिंग (वय ६०) हे या स्फोटात जखमी झाले आहेत व त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. इतर दोन जण किरकोळ जखमी आहेत, पण जखमींपैकी सर्वजण शीख आहेत की नाही हे समजू शकलेले नाही. स्फोटामुळे ग्रंथींच्या अंगावर काचेचे पूर्ण तावदानच कोसळले. हा स्फोट हेतुपुरस्सर केला असल्याचे पोलीस प्रवक्त्यांचे म्हणणे आहे. चेहरा झाकलेली व्यक्ती एसयूव्ही वाहनातून पळून जाताना दिसली. काळ्या रंगाच्या एसयूव्ही गाडीत असल्याच्या संशयावरून तीन जणांना अटक करण्यात आली आहे, स्फोटापूर्वी ही गाडी तेथे होती.