ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील मुनी बीचवर तीन भारतीयांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी हे तिघेही समुद्रात अडकलेल्या एका कुटुंबातील मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र, मोठ्या लाटांच्या प्रवाहामध्ये अडकून ते बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. तर एकाचा शोध अद्यापही सुरुच आहे.


बेपत्ता झालेल्या तिसऱ्या व्यक्तीचा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोध घेतला जात आहे. सोमवारी अंधार पडल्यानंतर हे बचाव कार्य थांबवण्यात आले होते. त्यानंतर ते मंगळवारी सकाळी पुन्हा सुरु करण्यात आले. अद्याप या तिसऱ्या व्यक्तीची कोणतीही माहिती समोर न आल्याने त्याची जिवंत राहण्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

तत्पूर्वी, सोमवारी या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने त्या मुलांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. सुत्रांकडून कळते की, सिडनीमध्ये राहणारे हे कुटुंब सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी इथे आले होते. दरम्यान, कुटुंबातील ३ अल्पवयीन मुली आंघोळीसाठी समुद्रात गेल्या, त्यानंतर त्या पाण्यात अडकून पडल्या होत्या.