श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे रविवारी झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे २०७ जण ठार झाले आहेत. यामध्ये ३ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सुषमा स्वराज यांनी म्हटले की, कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तांना तेथील नॅशनल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी कळवले आहे की, स्फोटातील मृतांमध्ये तीन भारतीय नागरिक आहेत. ही केवळ प्राथमिक असून याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, स्वराज यांनी श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना संदेश पाठवला असून त्यांना हवी ती मदत पुरवण्यासाठी भारत तयार असल्याचे म्हटले आहे. जर गरज पडल्यास आमचे वैद्यकीय पथकही तुमच्याकडे पाठवण्यात येईल, असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे.

इस्टर संडे असल्याने कोलंबोतील विविध चर्चमध्ये ख्रिस्ती लोकांनी प्रार्थनेसाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, सकाळच्या सुमारास इथल्या तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये लागोपाठ सहा स्फोट झाले, त्यानंतर दुपारी इतर दोन ठिकाणी आत्मघाती पथकांकडून दोन स्फोट घडवण्यात आले. अशा प्रकारे येथे आठ साखळी स्फोट घडवण्यात आले.

दहशतवाद्यांनी हे स्फोट घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्विकारलेली नाही. या स्फोटांमध्ये आत्तापर्यंत २०७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये ३५ परदेशी नागरिक आहेत यात ३ भारतीयांचा समावेश आहे. तसेच ४५० जण जखमी झाले आहेत.