काबूलमध्ये ‘नाटो’ला रसद पुरविणाऱ्या कंपनीच्या आवारात तालिबानी आत्मघातकी पथकाने केलेल्या हल्ल्यात बुधवारी तीन भारतीय नागरिक ठार झाले.
भारतीय नागरिक सदर कंपनीच्या आवारात काम करीत असताना एका मोठय़ा ट्रकमध्ये आत्मघातकी हल्लेखोराला ठेवण्यात आले होते. त्यानंतर दोन-तीन घुसखोरांची सुरक्षा रक्षकांसमवेत ३०-४० मिनिटे चकमक उडाली. त्यानंतर रक्षकांनी हल्लेखोरांना यमसदनास पाठविले.
भारतीय नागरिकांचे मृतदेह मायदेशात आणण्यासाठी सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
ट्रकमध्ये ठेवण्यात आलेल्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात आणि तालिबान्यांनी केलेल्या गोळीबारात किमान नऊ जण ठार झाले. ‘नाटो’ पुरवठा कंपनीचे प्रवेशद्वार या हल्ल्यात पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. या कंपनीमध्ये अन्न, पाणी, इंधन आणि अन्य साधने होती. त्याचप्रमाणे लष्कराच्या रसदीचा साठा आणि निवासाची व्यवस्थाही होती.
या हल्ल्यात तीन भारतीयांसह ब्रिटनचा एक आणि अन्य परदेशी नागरिक ठार झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे, २०१४च्या अखेपर्यंत आंतरराष्ट्रीय फौजा मागे घेण्यापूर्वी बंडखोरांशी शांतता करार करावा यासाठी, अफगाण सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.