पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एकूण तीन लोक जखमी झाले असून यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. भाजपा खासदार अर्जून सिंग यांच्या घरापासून काही अंतरावरच हा हल्ला करण्यात आला आहे. एकूण १५ ठिकाणी बॉम्बहल्ला करण्यात आला असून यावेळी हल्लेखोरांना ठिकठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीची तोडफोड केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र यावेळी त्यांना स्थानिकांच्या संतप्त आंदोलनाचा सामना करावा लागला. पोलिसांच्या उपस्थितीतच एक बॉम्ब फेकण्यात आल्याचा आरोप आहे. सध्याच्या घडीला या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे आणि यामागे काय हेतू आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

हल्ल्यानंतर भाजपा आमदार अर्जून सिंग घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. यावेळी त्यांनी पोलिसांना घटनास्थळावरुन निघून जाण्यास सांगितल्याचंही वृत्त आहे.

अर्जून सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही गेल्या १० ते १२ दिवसांपासून पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असूनही लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पावलं उचलली गेली नाहीत. आम्ही निवडणूक आयोगालाही राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंबंधी सांगितलं असून यादरम्यादनच बॉम्बहल्ल्याची घटना घडली आहे. खऱं तर सत्ताधाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलीस कोणतीही कारवाई करत नाही आहेत”.

अर्जून सिंग यांनी यावेळी इशाराही दिला आहे. “जर पोलीस काही कारवाई करु शकत नसतील तर मग हा खेळ खूपच धोकादायक होईल आणि तृणमूल काँग्रेस व गुंड संपतील,” असं ते म्हणाले आहेत. लोकांनी मतदान करु नये यासाठी भीती निर्माण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.