स्वातंत्र्यदिनीही पाकिस्तानकडून नियंत्रणरेषेवर सातत्याने गोळीबार करण्यात येत असून, गुरुवारी सकाळी काश्मीर खोऱयातील पूंछ विभागात करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये तीन जवानांसह काही नागरिक जखमी झाले.
पूंछमधील बालाकोटमध्ये गुरुवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून पाकिस्तानकडून भारतीय छावण्यांच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार करण्यात येत आहे. याच गोळीबारामध्ये तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारामध्ये पूंछमधील काही नागरिकही जखमी झाले आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही. गेल्या पाच दिवसांमध्ये पाकिस्तानकडून तब्बल ११ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय छावण्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला.
जम्मू विभागातील लष्कराचे प्रवक्ते एस. एन. आचार्य यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून मेंधार विभागातील छावण्यांवर अंदाधुद गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. दुपारपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच होता.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये २००३ मध्ये करण्यात आलेला शस्त्रसंधीचा करार निरर्थक ठरला आहे. सध्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून रोजच गोळीबार होतो आहे. अशाच स्वरुपाचा गोळीबार २००३ पूर्वीही होत होता, असे एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱयाने सांगितले.