देशभरात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला, तरी करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्याही वाढताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशभरात ३ लाख ३४ हजार ८२२ जणांनी करोनावर मात केली आहे. २९ जूनपर्यंत देशभरात एकूण ८६ लाख ८ हजार ६५४ नमूने तपासणी करण्यात आली आहे. यातील २ लाख १० हजार २९२ नमूने काल तपासले गेले आहेत.

देशभरात चोवीस तासांत करोनामुळे ४१८ जणांचा मृत्यू झाला असून, १८ हजार ५२२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहचली आहे. सध्या २ लाख १५ हजार १२५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत करोनामुळे देशभरात एकूण १६ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशात तसंच जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत करोनावरील लस विकसित करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे. परंतु अशातच सोमवारी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे.