फ्रान्सच्या संरक्षण उत्पादक डॅसॉल्ट एव्हिएशन यांनी बनविलेले आणखी तीन राफेल लढाऊ विमानांची नवी तुकडी बुधवारी भारतात दाखल होणार आहे. येणारी तीन राफेल लढाऊ विमाने अंबाला येथील आयएएफच्या गोल्डन अ‍ॅरो स्क्वॉड्रॉनमध्ये सामील होतील त्यामुळे या स्क्वॉड्रॉनमधील विमानांची संख्या १४ होईल.

फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनाईन यांनी मंगळवारी सांगितले होते की, पाच अतिरिक्त राफेल विमाने एप्रिल अखेरपर्यंत भारतात आणण्यात येणार आहेत. ही विमाने बुधवारी दाखल होणाऱ्या तीन राफेल व्यतिरिक्त असतील, असेही ते म्हणाले. या गोष्टीला “मोठ्या अभिमानाची बाब” म्हणत ते म्हणाले की, “कोविड -१९ महामारी असूनही आम्ही वेळेपेक्षा आधी आम्ही हे वितरित करू शकलो आहोत.”

फ्रान्सचे राजदूत म्हणाले की, “आत्तापर्यंत २१ राफेल विमाने भारतात पोहचवली गेली आहेत, ११ आधीच भारतात आणले गेले आहेत, तीन विमाने सध्या येत आहेत आणि एप्रिलच्या अखेरीस अतिरिक्त ५ विमाने आणण्यात येतील,’ असे भारतातील फ्रान्सचे राजदूत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “२०२२ मध्ये एकूण ३६ विमाने करारानुसार देण्यात येतील.” गेल्या वर्षी जुलै ते ऑगस्टच्या कालावधीत या विमानाने हवाई दलाच्या ताफ्यात सामील होण्यास सुरुवात केली होती आणि हवाई दलाने कमीतकमी वेळेत ते कार्यान्वित केले आहेत.

सप्टेंबर २०१६ मध्ये भारताने फ्रान्सकडून ३६ राफेल विमानांची मागणी केली होती आणि यातील ५० टक्क्यांहून अधिक एप्रिल २०२१ अखेर पर्यंत भारतात दाखल झाले आहेत. पाच राफेलची पहिली तुकडी २८ जुलै रोजी भारतात आली होती आणि सप्टेंबरमध्ये अंबाला येथे अधिकृतपणे दाखल करण्यात आली होती.

तीन राफेल विमानांची दुसरी तुकडी ३ नोव्हेंबरला आली, त्यानंतर २७ जानेवारीला आयएएफमध्ये दाखल झालेल्या आणखी तीन विमानांची तिसरी तुकडी आली. या विमानांना पूर्वेकडील लडाख आणि चीनच्या मोर्चावर गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आले होते.