बिथरलेल्या पाकिस्तानने सीमेवर आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये पाकिस्तानचे  ३ सैनिक ठार झाले आहेत. एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानी सैन्याकडून दुपारी उरी आणि राजौरी भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यानंतर पाकिस्तानी सैन्याने गोळीबारात ५ भारतीय जवानांना ठार केल्याचा दावा केला. मात्र, हा दावा खोटा असल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. उलट पाकिस्तानच्या या नापाक हरकतींवर प्रत्युत्तर देताना केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचेच ३ सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे.

काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम ३७० भारताने रद्द केल्यानंतर पाकिस्तान अक्षरशः बिथरला आहे. त्यामुळे या देशाकडून वारंवार भारताविरोधात वक्तव्ये आणि कारवाया केल्या जात आहेत. काल रात्री स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानच्या सैन्याने काही दहशतवाद्यांना नियंत्रण रेषेवरील उरी सेक्टरमधून काश्मीरमध्ये घुसवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठवताना पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या बचावासाठी भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबारही केला होता. मात्र, भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत या दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

मात्र, त्यानंतर आज सकाळपासूनच पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा उरी आणि राजौरी भागात गोळीबार सुरु केला. त्याला सध्या हायअॅलर्टवर असलेल्या भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.