चोरलेल्या दस्तावेजांची देवाणघेवाण करताना पाकिस्तानी उच्चायोगातील तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हे ऑपरेशन केलं. या कारवाईमुळे आधीपासूनच खराब असलेल्या भारत-पाकिस्तान संबंधात आणखी तणाव निर्माण होणार आहे.

अबिद हुसैन, ताहीर खान आणि जावेद हुसैन अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नाव असून ते थेट आय़एसआयच्या संपर्कात होते. आयएसआय पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दोघांना तात्काळ देश सोडण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी २०१६ साली पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली होती.

“राजनैतिक दूतावासाशी संबंधित असूनही पदाला न शोभणारे, विसंगत कार्य केल्याबद्दल दोघांनाही २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत” परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बाधा निर्माण करणारी कृती केल्याबद्दल भारताने पाकिस्तानकडे निषेध नोंदवला आहे. या प्रकरणी ऑफिशिअल सिक्रेट कायद्यातंर्गत एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने हेरगिरीचे आरोप फेटाळले आहेत. राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी हे विएन्ना कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.