आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) अंतिम यादीत समावेश नसलेल्या लोकांचा मताधिकार काढून घेण्यात येईल आणि त्यांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवले जाईल, असे भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली येथे आयोजित ‘एनआरसी: डिफेंडिंग दि बॉर्डर्स सिक्यूरिंग दि कल्चर’ या विषयावर आयोजित एका परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, १९८५ मध्ये झालेल्या ‘आसाम प्रस्तावा’नुसार एनआरसी अपडेट करण्यात येत आहे. त्यातंर्गत राज्यातील सर्व अवैध व्यक्तींचा शोध घेणे आणि त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी प्रतिबद्धता जाहीर करण्यात आली होती. एनआरसीमुळे सर्व अवैध व्यक्तींची ओळख सुनिश्चित होईल. अवैध व्यक्तींचे नाव मतदारयादीतून मिटवणे हे पुढचे पाऊल असेल. या लोकांना सर्व सरकारी सुविधांपासून वंचित ठेवले जाईल. त्यानंतरच्या टप्प्यात या व्यक्तींना देशाबाहेर काढण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी एनआरसीची संपूर्ण देशात अंमलबजावणी केली जाणार असल्याचे यावेळी सांगितले.

अवैध प्रवाशांना देशाबाहेर काढण्याच्या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर टीका होईल, या शंकेवर बोलताना राम माधव म्हणाले की, बांगलादेशही त्यांच्या देशातून लाखो रोहिंग्या लोकांना बाहेर काढण्यासाठी म्यानमारबरोबर चर्चा करत आहे. म्यानमारमध्ये अत्याचार झाल्यामुळे लाखो रोहिंग्या मुसलमान बांगलादेशात शरण गेले आहेत. जगातील कोणताही देश अवैध प्रवाशांना सहन करू शकत नाही. पण राजकीय कारणांमुळे अवैध प्रवाशांसाठी भारत ‘धर्मशाळा’ बनल्याची उपरोधिक टीका त्यांनी विरोधी पक्षांवर केली.