राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली तीन मंत्र्यांची समिती स्थापण्यात आली आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरूण जेटली आणि व्यंकय्या नायडू यांच्या या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती एनडीएच्या घटक पक्षांसोबत चर्चा करणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर सगळ्या पक्षांचे एकमत न झाल्यास १७ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची २८ जून पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
भाजपकडे टीआरएस आणि जगनरेड्डी पक्षाचा पाठिंबा आहे. तसेच एनडीएकडून राष्ट्रपतीपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यास भाजप आणि पर्यायाने एनडीचे पारडे जड असणार आहे. मात्र अमित शहा यांना निवडणुकांमध्ये कोणतीही कसर सोडायची नाहीये. म्हणूनच या त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. शिवसेनेची भूमिका काय आहे? त्याचा परिणाम काय होतो याचा अंदाजही भाजपला अद्याप आलेला नाही. त्यामुळे भाजपकडून खबरदारी घेतली जाते आहे.