देव तारी त्याला कोण मारी अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. याच म्हणाची प्रत्यय मध्य प्रदेशमधील टीकमगड येथील जैन कुटुंबाला आला. खेळता खेळता पर्व जैन हा तीन वर्षांचा मुलगा ३५ फूट उंचीच्या इमारतीवरुन पडला. मात्र त्याचवेळी इमारती खालून एक रिक्षा जात होती. या सायकलसारख्या तीन चाकी रिक्षाच्या मागील सीटवर हा मुलगा पडल्याचे त्याचा जीव वाचला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पर्व हा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये खेळत होता. मात्र खेळता खेळता त्याचा तोल गेल्याने तो ३५ फूटांवरुन खाली कोसळला. ते दृष्य पाहून घरातील अनेकांनी इमारतीखाली धाव घेतली. मात्र त्याचवेळी इमारतीखाली असणाऱ्या रस्त्यावर एक रिक्षावाला जात होता आणि नशीब बलवत्तर म्हणून पर्व थेट या रिक्षामध्ये पडला. एवढ्या वरुन पडूनही पर्वला केवळ खरचटले. पर्वला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या सर्व वैद्यकीय चाचण्यांमध्ये काहीच धोकादायक अढळून आले नाही आणि जैन कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पर्वच्या वडीलांनी हा रिक्षावाला आमच्या कुटुंबासाठी देवासारखा धावून आल्याच्या भावना व्यक्त केल्या. ‘हा रिक्षावाला वेळेत आला नसता तर मोठा अनर्थ घडला असता. तो बाल्कनीमध्ये खेळत असताना कशावर तरी चढला आणि तोल गेल्याने थेट खाली पडला. नशिबाने रिक्षा त्याचवेळी इमारती खालून जात असल्याने पर्व रिक्षात पडला आणि त्याचा जीव वाचला,’ अशा शब्दांमध्ये भावूक होत पार्वच्या वडीलांनी आपल्या भावना व्यक्त करत रिक्षावाल्याचे आभार मानले.

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला असून पालकांनी मुलांकडे दूर्लक्ष केल्यास असे अपघात होऊ शकतात. सर्वच पालकांनी सावध रहायला हवे असं मत अनेकांनी काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या व्हिडिओवर व्यक्त केले आहे.