केरळमध्ये एका तीन वर्षाच्या मुलाला जीवघेण्या करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्याच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता भारतात करोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा ४० वर पोहचला आहे. तर केरळमध्ये करोनाची लागण झालेल्यांची संख्या ९ झाली आहे.

हा मुलगा ७ मार्च रोजी सकाळी आपल्या कुटुंबासह इटलीवरून भारतात परतला होता. सध्या त्याला एर्नाकुलम येथील वैद्यकीय महाविद्यालयातील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलं आहे.

या अगोदर केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. देशातील रुग्णांची संख्या ३९ होती. या कुटुंबातील तिघेजण नुकतेच इटलीला जाऊन आलेले होते.

केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी या रुग्णांविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, पण जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. या कुटुंबातील लोकांनी विमानतळावर ते कोणत्या देशात जाऊन आले हे सांगितले नव्हते आणि त्यांची चाचणीही करण्यात आली नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांनी सुरुवातीला रुग्णालयात दाखल होण्यासही नकार दिला होता, पण आम्ही त्यांचे मन वळवून रुग्णालयात नेले.

हे पाचही जण पाथनमथिट्टा जिल्ह्य़ातील असून त्यात एक पन्नाशीतील जोडपे आणि त्यांचा २६ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे. ते सर्व जण १ मार्चला इटलीतून भारतात आले. संसर्ग झालेले इतर दोन जण त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. पाचही जणांना पाथनमथिट्टा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही शैलजा यांनी सांगितले.