तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. तिचा मृतदेह गुगा कॉलनी गुरुग्राम या ठिकाणी सापडला. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये नराधमांनी काठीचे तुकडे घातले होते अशीही माहिती समोर येते आहे. रविवारी ही मुलगी तिच्या घराबाहेरून खेळताना बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा शोध सुरु होता. पोलिसांना तिचा मृतदेह गुरुग्राम या ठिकाणी असलेल्या सेक्टर ६६ या ठिकाणी सापडला. ज्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला त्याने चॉकलेट देण्याचे आमिष देऊन तिला बोलावले होते. या मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दहा सेमी लांबीची काठी आढळली. माणुसकीला काळीमा फासणारे विकृत कृत्य गुरुग्राममध्ये घडले आहे.

तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाची ओळख पटली असून त्याचे नाव सुनील कुमार असल्याचे समजले आहे. सुनील कुमार मजुरीचे काम करतो आणि तो मूळचा उत्तरप्रदेशातील मथुरा या ठिकाणचा आहे. या घटनेनंतर तो फरार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत. गुरुग्रामध्ये राहणाऱ्या आईला आणि त्याच्या दोन बहिणींना भेटण्यासाठी सुनील गेल्या आठवड्यात आला होता असेही पोलिसांनी सांगितले आहे. आम्ही सुनील कुमाच्या कुटुंबीयांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवला आहे असेही पोलिसांनी सांगितले.

सुनील कुमार या नराधमाला शोधण्यासाठी पोलिसांनी चार पथकं तयार केली आहेत. ज्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा मृत्यू झाला त्या मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तिच्या अंगावर अनेक जखमा आहेत असे डॉक्टर दीपक माथुर यांनी स्पष्ट केले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. तिच्या कवटीला फ्रॅक्चर झाल्याचे तपासणीत आढळल्याचेही त्यांनी सांगितले.

पीडित मुलीच्या खांद्यावर, छातीवर, पाठीवर आणि गुप्तागांवर अनेक जखमा आहेत. तिच्यावर बलात्कार करून तिचा शारिरीक छळ करण्यात आल्याचे यावरून स्पष्ट होते आहे. असेही डॉक्टर माथुर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३०२ आणि पोस्को या दोन कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलीला सुनील कुमारसोबत जाताना ज्या मुलीने पाहिले होते तिने यासंदर्भातली माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. ज्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची १०६ प्रकरणं वर्ष सुरु झाल्यापासून घडली आहेत अशी माहिती गुरुग्राम चाईल्ड वेलफेअर कमिटीच्या अध्यक्ष शकुंतला धुल यांनी दिली आहे. तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अशा २० घटनांची नोंद झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी नराधमाला अटक करून कठोरातली कठोर शिक्षा द्या अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.