देशाच्या राजधानीत महिलांवरील अत्याचाराची परिस्थिती इतकी गंभीर आहे की देशाला हादरवणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाला (16 डिसेंबर 2002) सहा वर्ष पूर्ण झाले त्याच दिवशी अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्व दिल्लीच्या बिंदापूर परिसरात रविवारी ही घटना घडली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका 40 वर्षीय सुरक्षारक्षकाला चिमुकलीच्या वडिलांनी आणि इतर नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली असून त्याला आणि पीडित चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बालिकेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ही घटना घडली. दुपारी एक वाजेच्या सुमारास चिमुकली इमारतीखाली खेळण्यासाठी गेली होती. मात्र, साडेतीन वाजले तरीही ती न परतल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. तिचा शोध घेत चिमुकलीचे वडील तळमजल्यावर गेले असता सुरक्षारक्षकाच्या खोलीजवळ ती पडलेली दिसली, त्यावेळी रक्तस्त्राव होत होता. आरोपी सुरक्षारक्षकाने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तिच्या वडिलांनी त्याला पकडलं आणि आरडाओरडा करुन शेजाऱ्यांना बोलावलं. घडलेला प्रकार समजल्यानंतर शेजाऱ्यांनी त्या नराधमाला बेदम मारहाण केली त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

सध्या आरोपी सुरक्षारक्षक आणि पीडित चिमुकली दोघंही रुग्णालयात आहेत. चिमुकलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी, ‘निर्भया प्रकरणाच्या 6 वर्षांनंतरही आज दिल्लीत आणि देशात काहीही फरक पडलेला नाही’, असं म्हटलं. तसंच. पीडित चिमुकलीचा जीवनाशी संघर्ष सुरू असल्याची माहिती दिलीये.