उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये इमारत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर बचाव पथकाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. तब्बल १५ तास कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या एका चिमुरडीची बचाव पथकाने सुटका केली आहे. अजून २५ ते ३० लोक ढिगाऱ्याखाली अडकून पडले असल्याचा अंदाज बचाव पथकाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशच्या कानपूरजवळील जजमाऊ भागातील सहा मजली इमारत बुधवारी कोसळली. यानंतर गॅस कटर्स, विशेष कॅमेरे आणि बुलडोझरच्या मदतीने बचाव पथकाकडून मदत कार्याला सुरुवात झाली आहे. या मदतकार्यादरम्यान लक्ष्मी नावाच्या तीन वर्षीय चिमुरडीला बाहेर काढण्यात यश आले आहे. तब्बल १५ तास लक्ष्मी ढिगाऱ्याखाली अडकून पडली होती. लक्ष्मी कोसळलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहायची.

‘इमारत कोसळली तेव्हा लक्ष्मी पाचव्या मजल्यावर होती. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकाला ढिगाऱ्याखाली कोणीतरी जिवंत व्यक्ती असल्याचा अंदाज आला. यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकासोबत असणाऱ्या कुत्राला पाचारण करण्यात आले. यानंतर ढिगारा उपसून काढण्यात आल्यानंतर रडण्याचा आवाज ऐकू आला. पहाटे चारच्या सुमारास चिमुरडीला बाहेर काढण्यात यश आले. या चिमुरडीला तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले,’ अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इमारत कोसळल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचा नेता मेहताब आलमविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोसळलेली इमारत मेहताब आलमच्या मालकीची असल्याची माहिती पुढे येते आहे. आलम आणि त्याचे कुटुंबीय या घटनेनंतर फरार झाले आहे. ‘इमारत उभारण्यासाठी मेहताब आलमकडे आवश्यक परवानग्या नव्हत्या. मात्र तरीही मेहताब आलमकडून इमारतीचे बांधकाम करण्यात आले. इमारतीचा पाया अतिशय कमजोर होता. याप्रकरणी आलमला तीन नोटिसा बजावण्यात आल्या होत्या,’ अशी माहिती कानपूर विकास प्राधिकरणाने दिली आहे.

इमारत कोसळल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथके मदतकार्यासाठी वाराणसी आणि लखनौमधून कानपूरमध्ये दाखल झाली. लष्कराच्या जवानांनीदेखील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकांना मोलाची मदत केली. रात्रभराच्या मदतकार्यानंतर १८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला यश आले. ‘ही इमारत अत्यंत असुरक्षित होती. मोकळ्या जागांना स्तंभाच्या मदतीने कोणताही आधार देण्यात आला नव्हता,’ अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे अधिकारी आलोक कुमार सिंह यांनी दिली.