काळ्या पैश्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज तीन वर्ष पूर्ण झाली. पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला होता. रात्री आठ वाजता मोदींनी देशवासियांना संबोधित करताना नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आणि सर्वांनाच धक्का दिला. हा निर्णय फसला की यशस्वी ठरला यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमातांतरे आहेत. यावरुनच आज विरोधकांनी नोटबंदीचा निर्णय हे संकट होते अशा आशयाचा #DeMonetisationDisaster हा हॅशटॅग वापरुन या निर्णयावर टीका केली आहे. हरियाणा युवा काँग्रेसचे नेते दीपक त्यागी यांनीही नोटांच्या रंगांवरुन मोदी सरकारला टोला लगावला आहे.

त्यांनी यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये नोटबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटा दिसत आहेत. कपडे वाळत घालतात त्याप्रमाणे १०, ५०, १००, २०० ५०० आणि दोन हजारच्या नोटा चाप लावून दोरीला लटकवण्यात आल्या आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यागी यांनी या नोटा आल्या पण काळा पैसा कुठे आहे असा सवाल सरकारला केला आहे. “गुलाबी, हिरवी, नारंगी, जांभळी, तपकीरी अशा सर्वच रंगाच्या नोटा दिसत आहेत पण काळा पैसा कुठे आहे?,” असं त्यागी यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच आजचा दिवस काळा दिवस असल्याचेही त्यांनी #BlackDay हा हॅशटॅग वापरून म्हटलं आहे.

मोदींच्या त्या भाषणात १८ वेळा झाला होता काळा पैसा असा उल्लेख

नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर रोजी २०१६ रोजी केलेल्या भाषणात ‘काळा पैसा’ असा उल्लेख १८ वेळा
केला होता. मोदींनी २५ मिनिटांचे भाषण केले होते. तर फेक करन्सी किंवा काऊंटरफिट या शब्दाचा त्यांनी पाच वेळा वापर केला होते. १३ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत पंतप्रधानांनी विविध कार्यक्रमांमधून सहा वेळा नोटाबंदीबाबत भाष्य केले होते.