पालकांच्या बेजबाबदारपणामुळे तीन वर्षांची चिमुकली कितीतरी वेळ गाडीत अडकून पडली होती. हैदाराबादच्या बंगलोर हैदराबाद हायवेवर हा संपूर्ण प्रकार घडला आहे. तीन वर्षांच्या मुलीचे आई-वडिल त्या मुलीला गाडीत ठेवूनच नाश्ता करायला शेजारच्या उपहारगृहात गेले. पण नंतर मात्र ही मुलगी घाबरून जोर जोरात रडू लागली. या गाडी शेजारून जात असलेल्यांचे लक्ष या मुलीकडे गेले. पण आजूबाजूला तिचे पालक नसल्याने मात्र ही मुलगी आणखीच रडू लागली. त्यामुळे जमलेल्या लोकांनी तिला गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण गाडी लॉक असल्याने गाडी उघडण्यास उडथळा येत होता.
या मुलीचे पालक तिला गाडीत सोडून नाश्ता करायला गेले होते. ही मुगली गाडीतच झोपली होती. तर गाडीची चावी देखील तिच्यासोबत होती. त्यामुळे जमावाने हा प्रकार शेजारीच असलेल्या पोलिसांच्या लक्षात आणून दिला. पोलिसांनी देखील ही गाडी उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हाती अपयश आले. या सर्व प्रकारामुळे ही मुलगी २० मिनिंटांहूनही अधिक काळ गाडीत अडकून होती. गाडीचे दार उघडण्याच्या प्रयत्नात असताना ब-याच वेळानंतर तिचे पालक आले. आपल्या मुलीला गाडीतून बाहेर काढल्याबद्दल त्यांनी स्थानिकांचे आभार मानले, आणि कोणी काही बोलण्याच्या आतच त्यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.