उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये असलेल्या बाबा राघव दास रूग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झाल्यानं ३० मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. ‘आजतक’ या वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार १३ मुलं एनएनयू वॉर्डमध्ये दाखल होती, तर १७ मुलं मेंदूज्वर वॉर्ड मध्ये दाखल होती. ६९ लाख रूपयांचं बिल थकल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीनं गुरूवारी रात्रीपासूनच ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता. मागील ४८ तासात ३० मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यातील गोरखपूर जिल्ह्यात ही घटना घडल्यानं हळहळ व्यक्त होते आहे.

बाबा राघव दास रूग्णालयात अनेक रूग्णांवर उपचार सुरू असतात, मेंदूज्वर विभागातही लहान मुलांवर उपचार सुरू असतात, मात्र गेल्या दोन दिवसांपासून या रूग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत होती. या रूग्णालयाचं ६९ लाखांचं ऑक्सिजनचं बिल थकल्यामुळे पुरवठा बंद करण्यात आला होता. तसंच सिलिंडरही संपले होते त्यामुळे मागील ४८ तासांमध्ये लहान मुलांना आपला जीव गमावावा लागला आहे. या मृत्यूची जबाबदारी आता योगी सरकार घेणार का? असा संतप्त सवाल या मुलांच्या पालकांनी विचारला आहे. योगी आदित्यनाथ यांनी ९ आणि १० तारखेलाच या रूग्णालयाचा दौरा केला होता.

 

 

बाबा राघवदास रूग्णालयाला पुष्पा सेल्स सप्लाय या ऑक्सिजन कंपनीकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. १० लाख रूपयांपर्यंतचं बिल रूग्णालय प्रशासनाला त्यांच्या सोयीनं भरण्याची मुभा होती. मात्र हे बिल ६० लाख रूपयांच्या वरती गेल्यानं आणि आम्हाला आमचा एकही पैसा न मिळाल्यानं आम्ही ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तुम्ही लवकरात लवकर आमचं बिल चुकवा आम्ही तुम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा करू असं पत्रही आम्ही रूग्णालय प्रशासनाला लिहीलं होतं असंही या कंपनीनं म्हटलं आहे.

गोरखपूरमधील बाबा राघव दास रूग्णालयातला ऑक्सिजन पुरवठा गुरूवारीच बंद करण्यात आला होता आणि सिलिंडर शुक्रवारी संपले. मेंदूज्वर वॉर्डमधील रूग्णांना अँब्यू बॅगच्या आधारे ठेवण्यात आलं. मात्र रूग्णालय प्रशासनाच्या निष्काळाजीपणामुळे अखेर ३० मुलं दगावली आहेत. मेंदूज्वर विभागात मोठ्या सिलिंडरची कमतरता भासली होतीच अशात लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठाही बंद झाला. त्यामुळे ३० मुलं दगावल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे.

बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दोन वर्षांपूर्वीच लिक्विड ऑक्सिजनचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पाद्वारे गोरखपूर रूग्णालयातील ३०० रूग्णांना ऑक्सिजन पुरविला जात असे. मात्र या ऑक्सिजनचं बिल थकल्यानं लिक्विड गॅसचा पुरवठा बंद झाला.

मेंदूज्वर विभागाच्या वॉर्ड क्रमांक १०० मध्ये दर दीड तासाला ऑक्सिजनचे १६ सिलिंडर खर्च होत असतात. आज दुपारी १२ च्या दरम्यान सगळे सिलिंडरही संपले त्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला आहे. योगी आदित्यनाथ आता या सगळ्या प्रकरणी रूग्णालय प्रशासनावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारवाई काहीही झाली तरीही रूग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ३० मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान कोणाचाही मृत्यू ऑक्सिजनचा पुरवठा रोखला गेल्यानं झाला नाही अशी माहिती उत्तर प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आशुतोष टंडन यांनी दिली आहे. तसंच आज ७ लोकांचा मृत्यू झाला असल्याचंही त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

या सगळ्या प्रकरणाची चौकशी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल आणि त्या चौकशीचा अहवाल २४ तासात समोर येईल असंही आशुतोष टंडन यांनी म्हटलं आहे.