३० जणांना अटक

पणजी :  गोव्यातील कलंगुट किनाऱ्यावरील एका आलिशान हॉटेलमधील कॅसिनोतील कर्मचारी व पाहुण्यांना ओलीस ठेवल्याच्या आणि दंगल माजविल्याच्या आरोपावरून गुरुवारी सकाळी ३० जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

काही जणांनी कॅसिनोमधील कर्मचारी आणि पाहुण्यांना ओलीस ठेवून कॅसिनोमध्ये दंगल माजविली असल्याची तक्रार द प्राइड कॅसिनो समूह व्यवस्थापनाने पहाटे ३ वाजता पोलिसांकडे केल्याचे पोलीस उपायुक्त एडविन कोलाको यांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी कलंगुट किनाऱ्यावरील ला कॅलिप्सो हॉटेलमधील कॅसिनोकडे धाव घेतली आणि उद्योगपती कौशल खन्ना यांच्यासह ३० जणांना अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना घडली तेव्हा हॉटेलच्या संकुलात पाहुणे, कर्मचारी यांच्यासह ३०० हून अधिक जण हजर होते.

या प्रकरणी अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. जवळपास ४० जणांचा एक गट पहाटे कॅसिनोमध्ये आला आणि त्यांनी कॅसिनोमधील कर्मचारी आणि पाहुण्यांना धमकावण्यास सुरुवात केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.