नवी दिल्ली / भडोच : दिल्लीत शनिवारी एका रुग्णालयातील डॉक्टरसह १२ करोना रुग्णांचा प्राणवायूअभावी मृत्यू झाला, तर गुजरातमध्ये एका रुग्णालयात लागलेल्या आगीत १८ जणांचा बळी गेला. त्यापैकी १६ करोना रुग्ण होते.

दिल्लीस्थित बत्रा रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तेथील प्राणवायूचा साठा शनिवारी संपल्यामुळे आठ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात गॅस्ट्रोएण्टरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. के. हिमथानी यांचा समावेश असल्याचे या रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. डॉ. हिमथानी यांना २० दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आगीची दुर्घटना गुजरातच्या भडोच जिल्ह्यातील पटेल वेल्फेअर रुग्णालयात शनिवारी सकाळी घडली. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत दोन कर्मचारी आणि १६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. आगीत रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग जळून खाक झाला. या चार मजली इमारतीमधील करोना कक्षात आग लागली त्यावेळी तेथे अन्य ५० रुग्णही होते. त्यांना स्थानिकांनी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले. आग लागल्यामुळे अतिदक्षता विभागात धुराचे साम्राज्य पसरले. त्यात १२ करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे भडोचच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले. अन्य सहा जणांचा मृत्यू रुग्णालयातच झाला की त्यांना अन्य रुग्णालयात हलवताना झाला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.