केंद्र सरकार येत्या दोन वर्षांत रोज ३० कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण करील, सध्या रोज दिवसाला अकरा कि.मी. रस्त्याचे काम होत आहे, अशी माहिती राज्यसभेत देण्यात आली.
प्रश्नोत्तराच्या तासाला रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, की आम्ही पुढील दोन वर्षांत रोज ३० कि.मी. रस्तेबांधणी करणार आहोत. सध्या हे प्रमाण फार कमी म्हणजे रोज ११ कि.मी. आहे ते आताच्या मार्चमध्ये रोज १५ कि.मी.पर्यंत नेण्यात यश आले आहे.
आणखी एका प्रश्नावर त्यांनी सांगितले, की दिल्ली-आग्रा महामार्गावर जी टोलवसुली डीए टोल रोडकडून केली जात आहे ते पैसे कॅग अहवालानंतर एका सशर्त खात्यात (एस्क्रो अकाऊंट) टाकले जात आहेत.
 गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कॅगच्या अहवालात असे म्हटले होते, की ऑगस्ट २०१३पर्यंत डीए टोल रोडने १२० कोटी रुपये टोल म्हणून वसूल केले आहेत. भारतीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाला जमीन अधिग्रहण, पर्यावरण, वन परवाने यामुळे कामात विलंबास तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आता बीओटीसाठी ८० टक्के तर इपीसी प्रकल्पांसाठी ९० टक्के जमीन अधिग्रहित झाल्याशिवाय प्रकल्पांना परवानगी दिली जाणार नाही. रस्त्यांच्या प्रकल्पांसाठी सरकार आता कराराचा नवीन नमुना तयार करणार आहे. सामान्य लोकांवर टोलचे जे ओझे लादले जात आहे ते कमी केले जाईल व त्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्यात आला आहे.