उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील दुर्घटना; अपघात मालिका सुरूच

उत्तर प्रदेशात औरैया येथे शनिवारी स्थलांतरित मजुरांची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांच्या भीषण अपघातात २५, तर मध्य प्रदेशात ट्रक उलटल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या पाच मजुरांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील अपघातात ४०, तर मध्य प्रदेशातील अपघातात १९ मजूर जखमी झाले.

टाळेबंदीत रोजगार बुडाल्याने पोटाची भ्रांत असलेले हे मजूर आपल्या मूळ गावी परतण्यासाठी ट्रक आणि ट्रेलरने प्रवास करीत होते. उत्तर प्रदेशातील बहुतांश मृत आणि जखमी मजूर झारखंड, पश्चिम बंगाल, तर काही उत्तर प्रदेशातील कुशीनगरचे आहेत. दिल्ली-कानपूर मार्गावर पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींपैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

दिल्लीहून स्टेशनरी साहित्य घेऊन मध्य प्रदेशकडे निघालेल्या ट्रकने २२ स्थलांतरित मजूर प्रवास करीत होते. ते न्याहारीसाठी थांबले असताना उभ्या केलेल्या ट्रकला एका भरधाव ट्रेलरने धडक दिली. या ट्रेलरमध्येही ४३ स्थलांतरित मजूर होते. हा ट्रेलर राजस्थानहून येत होता, तर उभा असलेला ट्रक दिल्लीहून मध्य प्रदेशातील छत्तरपूरकडे निघाला होता, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.  ट्रकमधून मजुरांची वाहतूक करण्यास बंदी असतानाही अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करून जबाबदारी पार पाडण्यात हयगय केल्याच्या कारणास्तव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दोन पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना निलंबित केले आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपये सानुग्रह मदत जाहीर केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शोक व्यक्त केला असून कानपूरचे विभागीय आयुक्तआणि पोलीस महानिरीक्षकोंनाघटनास्थळी भेट देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

अपघात नव्हे, मजुरांची हत्या- विरोधक

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने या अपघातास उत्तर प्रदेशातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. हा अपघात नाही, तर मजुरांची हत्या आहे, अशी प्रतिक्रिया दोन्ही पक्षांनी व्यक्त केली. भाजप सरकार मजुरांसाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था का करीत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

हतबलतेच्या मार्गावर शेकडोंचे बळी

‘जनता संचारबंदी’ नंतर दोनच दिवसांनी भारत सरकारने देशभर अनपेक्षितपणे टाळेबंदी-१ जाहीर केली आणि उद्याच्या चितेंने मुंबईतील बाजारपेठा रात्री नऊच्या सुमारास गजबजल्या. सर्वसामान्य भारतीय जेव्हा गहू, तांदूळ, भाजीपाला, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंची बेगमी करत होते, तेव्हा हातावर पोट असलेल्या एका हतबल वर्गाचा आपल्या गावाकडे प्रवास सुरू झाला होता. चौथी टाळेबंदी येऊ घातली तरी या वर्गाची परवड थांबलेली नाही. ही परवड, हतलबलता इतकी की आतापर्यंत ११५ हून अधिकांना आपला जीव गमवावा लागला.